आनंद

आज सकाळी तो ऑफिसला जायला तयार होत होता, तितक्यात त्याला आतल्या खोलीतून रडण्याचा आवाज आला. त्याने आत जाऊन पाहिले तर त्याची बायको रडत होती. तिच्या अंगठीतील खडा पडला होता. ही अंगठी तिच्या माहेरची आता एकमेव आठवण राहिली होती.

दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे दोघांना घरातून हद्दपार केले होते आणि पुन्हा यायला मज्जाव केला होता, त्यामुळे आता दोघेच संसार करत होते.

तिचा तो रडवेला चेहरा त्याला पाहवला नाही. त्याने खाली गुडघ्यावर बसून हळूच तिचा खाली असणारा चेहरा हनुवटीला हात लावून वर उचलला आणि तिचे अश्रू पुसले.

तिच्याकडून ती अंगठी घेतली आणि पूर्वीसारखे हसू तिच्या चेहऱ्यावर दिसायला हवे, या अटीवर आपण अंगठी पूर्वीसारखी करून आणू असे तिला सांगितले. तो तिला वचन देऊन बाहेर पडला खरा! पण घर चालवताना त्याच्या नाकी नऊ येत असताना हा खर्च कसा करावा याचे त्याला कोडे पडले होते.

तो संध्याकाळी घरी परतला तेव्हा त्याने अंगठी पूर्ववत करून आणली होती मात्र गाडी त्याच्याकडे नव्हती. तिने गाडीबद्दल विचारताच तो म्हणाला, “तुझ्या आनंदासमोर गाडी ती काय चीज!”

तिच्या चेहऱ्यावरील हास्यामध्ये त्याने आपले गाडी विकल्याचे दुःख सहजासहजी लपवले होते.

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने तो थोडा उशिरा उठला, तर खिडकीतून बाहेर दारात त्याला गाडी दिसली. तो आश्चर्याने बाहेर येण्यासाठी उठला तर तिथेच शेजारी त्याला कागदाचा एक कपटा दिसला.

त्याने तो कागद उघडला तर ती तिने अंगठी विकल्याची पावती होती आणि खाली लिहिले होते,

“तुझ्या आनंदासमोर अंगठी ती काय चीज!”

प्रतिराज मांगोलीकर

🅿®Ⓜ

Advertisements